पत्नीचा खून करणाऱ्या तिच्या क्रूर
पती आणी सासूला अखेर जन्मठेप
(सात वर्षाने ज्योतीच्या कुटुंबीयांना न्याय)
पनवेल : प्रतिनिधी
सात वर्षा पूर्वी सुनेचा अमानुष छळ करून तिचा खून करून नंतर चुलीवर तिला ढकलून तिच्या अंगावर रॉकेल ओतून हत्या करण्यात आली होती या घटनेला जवळपास सात वर्ष उलटली असून अखेर नराधम पती व सासूला न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे .
पनवेल तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १५३/२०१५, भा.द.वि.क. ३०२, ४९८ अ, ३०४ ब, पनवेल येथिल अति सत्र न्यायाधीश जे. डी.वडणे, यांनी दिनांक २८/०९/२०२२ रोजी आरोपी पती निलेश रामकृष्ण म्हात्रे व सासू मालती रामकृष्ण म्हात्रे यांना इ.पि.को.क. ३०२, ३०४ व ४९८ अ. ३४ अन्वये विवाहित महिला ज्योती हिचा अमानुष छळ व खुन या कारणाखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तसेच दोघांना एकूण ६०,०००/- रूपये दंड ठोठावला आहे. सदरचे दंड नुकसान भरपाई म्हणून फिर्यादी देण्याचे आदेश कोर्टाने केलेले आहे.
पेण रावे येथील ज्योती हिरामण टावरी हीचा विवाह मौजे कासारभट येथील निलेश म्हात्रे यांचेबरोबर दिनांक ०२/०५/२०१५ रोजी झाला होता.
लग्न झाल्यावर काही दिवसच सासरचे मंडळीनी तिला व्यवस्थित नांदविले मात्र त्यानंतर त्यांनी तिचा छळ सुरु केला . नवरा, सासू, सासरे व नणंद यांनी अमानुष छळ करण्यास सुरूवात केली होती कसे तिच्या कुटुंबियांनी सांगितले .
निलेश ज्योतीला फ्लॅट घेण्यासाठी हुंडा म्हणून माहेरून पैसे आणायला सांगत असे. दिनांक २०/१०/२०१५ रोजी आरोपी यांनी किचनमध्ये तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळले व दरवाज्याची कडी लावून ते पसार झाले.
सदरची खबर गावात समजता ज्योतीचे वडील फिर्यादी हिरामण टावरी घटनास्थळी आले. व त्यांनी पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये येवून आरोपी विरूध्द गुन्हयाची फिर्याद दिली.
सदर प्रकरणी आरोपी विरूद्ध ई.पि.को.क. ३०२, ३०४ ब ४९८ अ, ३४ अन्वये दोषारोप ठेवण्यात आला सरकार पक्षातर्फे सहा. सरकारी वकील वाय. एस. भोपी यांनी एकूण १२ साक्षीदार तपासले व जोरदार युक्तिवाद केला. आरोपी तर्फे वकील अरविंद चामले व वकील एम. एम. गुंजाळ, वकील इंद्रजित भोसले यांनी काम पाहिले दोन्ही पक्षाचा युक्तिवाद एकूण मा. कोर्टाने नराधमाना वरील प्रकारची कठोर शिक्षा सुनावली आहे.
हुंडाबळी आणि खून अश्या घटना समाजात सतत वाढत असल्याने सदरच्या कोर्टाचा निकाल हा समाजासाठी इशारा ठरणार आहे हे मात्र नक्की.