*ट्विंकल ग्रुप विरोधात आझाद मैदानात गुंतवणूकदारांचा आक्रोश*
२० लाख ठेविदारांची : १२ हजार कोटींची फसवणूक
मुंबई : प्रतिनिधी
मुंबई येथे दि. १५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत आंदोलन करण्यात आले .
ओमप्रकाश बसंतलाल गोएंका याने १९८६ साली मिरा ग्रुप व ट्विकंल ग्रुपच्या अंतर्गत विविध कंपन्या स्थापन करुन टाईम शेअर हॉलिडे प्लॅनच्या (हॉटेल सुविधा व न वापरल्यास ठराविक रकमेचा परतावा देणे) माध्यमातून २० लाख ठेविदारांना सभासदत्व देऊन मल्टिलेवल मार्केटिंग पध्दतीने १४ लाख ६५ हजार एजंटामार्फत २० हजार १९८ कोटी रुपये गोळा करून, त्यातील रक्कम देश विदेशातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, रियल इस्टेटमध्ये व ३०० ते ४०० अवैध शेल कंपन्यामध्ये मनी लॉन्ड्रींग करुन ओमप्रकाश गोएंका याने स्वतःच्या व कुटूंबाच्या नावावर देश-विदेशात मालमत्ता घेतल्या असल्याचे मत आंदोलनात करण्यात आले . ओमप्रकाश गोएंका याने मुलगा गौरव गोएंका याला या रकमेतून रु. ८०० कोटी मिरा ग्रुपचा मॅनेजिंग डायरेक्टर बनवून जगभरातील हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये पैसे गुंतवायला दिले व बायकोचा चुलत भाऊ विनोद गोएंका याच्या मार्फत कोट्यावधी रुपये डी. बी. रियल्टि मध्ये गुंतविले आहेत. तसेच सन २००० ते २०१७ पर्यंत पैसे गोळा करण्यास सेबी या सरकारी यंत्रणेने बंदी घालूनही ओमप्रकाश गोएंका याने सरकारी आदेशाला केराची टोपली दाखवून पैसे गोळा करून सन २०१७ साली ओमप्रकाश गोएंका याने गुंतवणुक दारामधील सायली राणे व एकनाथ आहेर या व्यक्तिना आमिष दाखवून त्याच्याकडून त्यांचे पैसे मिळाले नाही म्हणुन अहमदाबाद येथील देवेंद्र पदमचंद जैन या दिवाळखोर तज्ञाकडे २० एप्रिल २०१७ रोजी अर्ज करायला लावून त्याच्या मार्फत २ मे २०१७ रोजी १२ दिवसात एन.सी.एल.टी. मुंबई या मा. कोर्टाकडून दिवाळखोरी जाहीर करुन घेतली.
देवेंद्र पदमचंद जैन या दिवाळखोर तज्ञाने ओमप्रकाश गोएंका याच्याकडून त्याचे दुबई मध्ये ऑफिस घेण्याचे ध्येय व उदिष्ट साध्य करण्यासाठी अंदाजे १०० कोटी रुपयांची लाच घेवुन ओमप्रकाश गोएंका याने गुंतवणुकदारांकडून गोळा केलेल्या ११ हजार कोटी रुपयांच्या रकमेतून घेतलेल्या देश विदेशातील मालमत्तांची व ३०० ते ४०० कंपन्या मध्ये गुंतविलेल्या पैशाची कोणतीही शहानिशा न करताच ओमप्रकाश गोएंका याची दिवाळखोरी जाहीर केली.
ओमप्रकाश वसंतलाल गोएंका याने ट्विंकल ग्रुप व मिराह ग्रुप मार्फत २० लाख गुंतवणूकदारांकडून, त्यातील प्रामुख्याने महाराष्ट्रातील १६ लाख गुंतवणूकदारांकडून हॉलिडे प्लॅन विकले. मात्र दोन गुंतवणूकदार प्रतिनिधीकडून खोटी दिवाळखोरी आणण्यासाठी २ लाख २१ हजार रुपयांच्या मागणीवरून ११५०० कोटी रुपयांची दिवाळखोरी गुजरात, अहमदाबाद येथील देवेंद्र पदमचंद जैन या दिवाळखोर तज्ञाला व डेलॉईट, जी डागा आणि कंपनी, एस चंदुलाल आणि कंपनी, कटरुका अँड असोसिएटस इत्यादी ऑडीटरांना हाताशी धरून त्यांचेकडून खोटे ऑडीट रिपोर्ट करून घेतल्यामुळे ओमप्रकाश बंसंतलाल गोएंका, ट्विंकल व मिरा ग्रुपच्या अंतर्गत असलेल्या सर्व कंपन्यांचे संचालक व त्याला मदत करणारे ऑडीटर, फॉरेंन्सिक ऑडिटर, दिवाळखोर तज्ञ यांचेवर आजपर्यंत कोणतीही कडक कारवाई न केल्यामुळे महाराष्ट्रातील १६ लाख कुटुंबे देशोधडीला लावल्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बहुसंख्य गुंतवणूकदारांचे वतीने शांततेच्या मार्गाने, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी लाल किल्ल्यावरून 'ना खाऊंगा ना खाने दूंगा' या वाक्यानुसार भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी याचेवर कारवाई करण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे .
आझाद मैदान या ठिकाणी पार पडलेल्या मीरा ट्विंकल सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जयश्री गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली व संस्थेचे संस्थेच्या हजारो खातेदारांनी ठियांदोलन केले या आंदोलनावेळी जयश्री गाडगीळ यांनी सांगितले की जोपर्यंत सर्वसामान्य गोरगरिबांचे पैसे ओम प्रकाश गोयंका यांच्यामार्फत मिळणार नाहीत तोपर्यंत हा लढा असाच सुरू ठेवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी आंदोलनासाठी आलेल्या ठेवीदारांशी आम्ही बातचीत करत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. या वेळी त्यांच्याकडून असे सांगण्यात आले की आम्ही रोजी रोटी करणारी लोक, आम्ही धुनी भांडी घरकाम करणारे लोक, तुटपुंज्या पगारावरती नोकरी करून महिन्याच्या महिन्याला आम्ही या ट्विंकल मध्ये पैसे भरत होतो पण आम्हाला याचा काहीही फायदा झाला नाही आज आमच्या वरती उपासमारीची वेळ आलेली आहे.माझा नवरा मार्केटमध्ये जरी गेला तरी त्याच्या अंगावरती लोक धावून येतात त्यांना मारहाण करतात आणि त्यांनी गळफासही लावून घेण्याचा दोन वेळा प्रयत्न केला असा प्रकार आमच्या सोबत होत आहे.तर काहींनी सांगितले की माझ्या मुलीच्या लग्नासाठी ठेवलेली थोडीशी तुटपुंजी रक्कम माझ्या मुलीच्या लग्नासाठी ठेवली होती तर संसारासाठी ठेवलेला एकही पैसा कामी नाहि आला. या कंपनीने मात्र आमच्या संसाराचे वाटोळे केले आम्हाला उघड्यावर टाकले असेही सांगण्यात आले. लवकरात लवकर परमेश्वराने आमचे पैसे मिळवून द्यावे आणि आमच्या संसार हा सुरळीत चालावा यासाठी आम्ही या भगवंताला साकडे सुद्धा घालत आहोत आमच्यावर झालेली मारहाण पाहता पोलीस स्टेशनमध्ये जरी गेलो असलो तरी पोलीस स्टेशनचे अधिकारी सांगतात की आम्हाला सांगून तुम्ही पैसा टाकला नव्हता तर आम्हाला याविषयी काही सांगायचं नाही अशीही उडवा उडवीची उत्तर आम्हाला या पोलीस शासनामार्फत या ठिकाणी मिळत असतात.असे गुंतवणूकदार यांनी सांगीतले.
या प्रकरनी राज्य शासन कोणत्या प्रकारची दखल घेणार व ट्विंकल ग्रुप यांचे सर्वेसर्वा गोयांक कुटुंबीय तसेच कंपनीचे उच्च अधिकारी यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई होणार हे पाहणे गरजेचे आहे राज्यात आलेले एकनाथ शिंदे यांचे सरकार हे या प्रकरणाला नक्कीच वाचा फोडून सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे पैसे त्यांना मिळून देण्यासाठी सक्षम आहे अशी आशा या आंदोलनातून व्यक्त करण्यात आलेली आहे.