म. ए .सो. ज्ञानमंदिर विद्यालयाचा वर्धापन दिन उत्साहात
साजरा
कळंबोली : प्रतिनिधी
म. ए .सो. ज्ञानमंदिर विद्यालयात
शुक्रवार दि.1 जुलै 2022 रोजी शाळेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या संस्थेने ठरविलेल्या शैक्षणिक ध्येय धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले आहे. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शाळेने समाजोपयोगी कोविड 19 लसीकरणासारख्या उपक्रमांचे व शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करून हे रौप्य महोत्सवी वर्ष उत्साहात साजरे केले.
आज या वर्धापन दिनाचे औचित्य साधून एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रगती ज्वेलर्स चे मालक , कळंबोली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष, पनवेल महानगरपालिका व्यापारी असोसिएशनचे संयोजक कमल कोठारी आणि उद्योजक मनीष तिवारी उपस्थित होते. तसेच कळंबोलीतील नामवंत उद्योजक म्हणून प्रसिद्ध असलेल्या माजी विद्यार्थी केतन बाणे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असे मनोगत व्यक्त करून आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. पालक प्रतिनिधी म्हणून छाया बोराटे यांनी आपल्या मनोगतातून आपला शाळेबद्दल चा विश्वास व्यक्त केला.
पाहुण्यांनी आपण शाळेस सहकार्य करण्यासाठी नेहमीच तत्पर आहोत अशी भावना व्यक्त केली. प्रास्ताविकात माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रोहिणी गायकवाड यांनी शाळेतील सर्व घडामोडींचा आढावा घेतला. शाळेचे महामात्र गोविंद कुलकर्णी सर यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचे विद्यालयातर्फे अभिनंदन केले.अध्यक्षीय भाषणात पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रियंका फडके यांनी शाळेच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका संजना बाईत यांनी आभार प्रदर्शनाच्या मनोगतात रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलार पॅनल यांची भविष्यात शाळेसाठी सोय करण्याचा मानस असल्याचे सांगितले. शेवटी पाहुण्यांनी दिलेल्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले व विद्यार्थ्यांची दिंडी संपूर्ण शाळेच्या परिसरात काढण्यात आली .या दिंडीत वारकरी, विठ्ठल, रखुमाई च्या वेशात विद्यार्थी होते. विठू नामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. पालकवृंद, माजी विद्यार्थी, हितचिंतक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते. सर्वांनी विठुरायाच्या मंदिरात जाऊन मनोभावे आरती केली. अशा पद्धतीने वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. दिपाली कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमासाठी शाला समिती अध्यक्ष मा. देवदत्त भिशीकर आणि महामात्र मा. डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले होते.