रायगड जिल्ह्यात १७ हजार ३०० शिवभोजन थाळींना मंजूरी
अलिबाग : लढवय्या न्यूज नेटवर्क
राज्यात स्वस्त दरात शासकीय अनुदान प्राप्त शिवभोजन केंद्रातून शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देण्याची योजना राबविण्यात येत आहे. करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे देशात तसेच राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे परराज्यातील तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्हयातील अनेक कामगार, मजूर हे रायगड जिल्हयातील पनवेल, खोपोली, खालापूर, उरण, कर्जत, पेण, अलिबाग इत्यादी भागात अडकून पडलेले आहेत. रोजगाराअभावी या लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तसेच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शिवभोजन केंद्रासाठी वाढीव शिवभोजन थाळींना मंजूरी देण्यात आली आहे.
पनवेल (महानगरपालिका क्षेत्र) मंजूर थाळींची संख्या ३ हजार १५० पनवेल (ग्रामीण क्षेत्र) २ हजार, अलिबाग शहर-१ हजार ५०, अलिबाग (ग्रामीण)- ४००, पेण-१ हजार १०० मुरूड-४००, उरण-२ हजार १००, रोहा-१ हजार १००, सुधागड-४७५ , कर्जत-४००, खालापूर-२ हजार १००, महाड-६००, माणगाव-६००, पोलादपूर- ४७५, म्हसळा-४२५, श्रीवर्धन-६००, तळा- ३२५ असे एकूण १७ हजार ३०० थाळींना मंजूरी देण्यात आली आहे.
लॉकडाऊनमुळे रायगड जिल्हयामध्ये अडकलेल्या इतर राज्यातील तसेच राज्यातील इतर जिल्हयातील कामगार, मजूर,गरीब, गरजू लोकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रायगड निधी चौधरी यांनी केले आहे.