पनवेल मनपा क्षेत्राच्या ग्रामपंचायतीतील ३२० कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेणार
राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा पुढाकार ,
पनवेल : लढवय्या रोखठोक नेटवर्क
म्युनिसिपल एम्प्लोइज युनियन यांच्याकडून २९ गावातील २३ ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे पनवेल महानगरपालिकेत समावेशन व्हावे या प्रमुख मागणीसाठी तसेच सातवा वेतन आयोग लागू करावा या मागण्यासाठी केलेल्या आंदोलनाला व लॉंग मार्चला अखेर यश आले आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या ३२० कर्मचाऱ्यांना पनवेल महापालिकेच्या सेवेत एका महिन्यात समाविष्ट करून घेण्याचे आश्वासन नगरविकासमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यावेळी शेकाप आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, पनवेल महानगरपालिका विरोधीपक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे, म्युनिसिपल एम्प्लोइज युनियन अध्यक्ष ऍड. सुरेश ठाकूर,सचिव अनिल जाधव, शेकाप सहचिटणीस आर.डी.घरत उपस्थित होते.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील ग्रामपंचायतींचा महानगरपालिकेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये वर्षानुवर्षे काम करत असणाऱ्या ३२० कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. याची दखल घेऊन त्यांना पनवेल महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली होती.
त्यावर या कर्मचाऱ्यांना महिन्याभरात सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन ना. शिंदे यांनी यावेळी दिले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी रायगड जिल्हा पालकमंत्री अदिती तटकरे, शेकाप आमदार बाळाराम पाटील माजी आमदार मनोहर भोईर, पनवेल महानगरपालिका विरोधीपक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे, म्युनिसिपल एम्प्लोइज युनियन अध्यक्ष ऍड. सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष पवार , सचिव अनिल जाधव, शेकाप सहचिटणीस आर.डी.घरत, राजेंद्र मढवी तसेच इतर लोकप्रतिनिधी व संघटनांचे पदाधिकारी यांनी केलेल्या सविस्तर चर्चेमुळे व या सर्वांच्या विशेष पाठपुराव्यामुळे अखेर यश आले असून लवकरच या सर्व ३२० कामगारांना कायमस्वरूपी तत्वावर महानगरपालिकेत समाविष्ठ करून घेण्यात येणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आले आहे ,तसेच " सातवे वेतन आयोग "लागू करण्याविषयीही कार्यवाही होणार असून तसे लेखी हमी पत्र मंत्रालयाकडून मिळाले आहे.
२२ जानेवारी २०२० रोजी म्युनिसिपल एम्प्लोइज युनियन यांच्याकडून या मागण्यांसाठी पनवेल महानगरपालिका ते मंत्रालय मुंबईपर्यंत लॉंग मार्चचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोर्चा पनवेल ते मुंबई असा मार्गक्रमण करत असताना सानपाडा (नवी मुंबई) येथे पोहचला असताना, रायगड जिल्हा पालकमंत्री अदिती तटकरे व शेकाप आमदार बाळाराम पाटील यांनी सन्माननीय लोकप्रतिनिधी व संघटनांचे पदाधिकारी यांना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चेसाठी मंत्रालयात यावे असे पाचारण करण्यात आले. सदर मोर्चा सानपाडा (नवी मुंबई) येथे थांबवून लोकप्रतिनिधी व संघटनांचे पदाधिकारी यांनी मंत्रालयात जाऊन यशस्वी चर्चा करून तसेच लेखी हमी पत्र घेऊन पुन्हा सानपाडा (नवी मुंबई) येथे रवाना झाले व सर्व लोकप्रतिनिधी, घटनांचे पदाधिकारी तसेच कामगार वर्ग यांच्या उपस्थितीत "कामगार एकजुटीचा विजय जल्लोष" साजरा करण्यात आला.