रा.जि. प आदेशाला केराची टोपली
उरण : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक
उरण पंचायत समितीच्या हद्दीत असलेल्या नवघर ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहार प्रकरणी रायगड जिल्हा परिषदेकडून आदेश मिळवून देखील आज तागायत संबंधितांवर कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल झालेला नाही त्यामुळे उरण पंचायत समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे . या प्रकारानंतर पूर्णपणे गैरप्रकार करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम उरण पंचायत समितीच्या वतीने केले जात असल्याचे स्पष्ट होत असून,
उरण पंचायत समितीच्या वतीने हा गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे .
या प्रकरणात शासन निर्णय ४/१/२०१७ आदेशानुसार स्वतः उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी याबाबत गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना विनाकारण पत्रव्यवहार करून आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना याबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा असे वारंवार सांगितले जात असल्याने सध्या या अधिकाऱ्यांनी आपल्या शिष्टमंडळाच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी दिलीप हळदे यांची भेट घेऊन हा प्रकार लक्षात आणून दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
त्यामुळे आता याप्रकरणी रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या कार्यालयातून उरण पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची कान उघडणे होणार का ? व नवघर ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहारप्रकरणी दोषी असलेल्या वर कारवाई होणार का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे .
उरण पंचायत समितीला काही महिन्यांपूर्वी रायगड जिल्हा परिषदेकडून गैरव्यवहार प्रकरणी लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा असे आदेश मिळून देखील या आदेशाला केराची टोपली दाखवून आपली वेळ मारून नेण्याची कामगिरी पंचायत समिती उरण यांच्या वतीने केली जात आहे .
या प्रकाराला खतपाणी घालण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात असून या प्रकाराने गैरव्यवहार करणारे इतर ग्रामपंचायतींमध्ये घोटाळे करण्यासाठी मोकाट झाले आहेत.