धार्मिक स्थळांना टँकरव्दारे मोफत पाणी पुरवठा करा, विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांची मागणी
पनवेल : लढवय्या रोखठोक
मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना रमझान नुकताच सुरु झालेला आहे, त्यामुळे धार्मिक ठिकाणी पाण्याचा वापर अधिक प्रमाणात होणार आहे. त्याअनुषंगाने पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर या ठिकाणची लोकसंख्या लक्षात घेता पनवेल महानगरपालिकेने अशा धार्मिक ठिकाणी ज्यादा टँकरने पाणी पुरवठा सुरु करावा अशी मागणी पमपा विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी आयुक्तांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, महापालिका क्षेत्रात भीषण पाटील टंचाई झाली आहे. त्यामुळे नागरीकांचे प्रचंड हाल होत आहे. खाजगी टँकरव्दारे तसेच बाटली बंद पाणी वापरण्याशिवाय त्यांना पर्यांय उरला नाही. या अनुशंगाने महानगरपालिका प्रशानसनाने नियोजन अपुरे आहे. दरम्यान मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु झाला आहे. आपल्याकडे मुस्लिम समाजाची लोकसंख्या ध्यानात घेता अधिक पाण्याची अधिक गरज आहे. तरी प्रशासनाने रमजानच्या महिन्यात मस्जिदमध्ये सुरळीत पाणी पुरवठा करावा. तसेच इतर धर्मियांच्या धार्मिक स्थळांना मागणीनुसार टँकरव्दारे मोफत पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी आयुक्तांकडे निवेदनाव्दारे केली आहे.