गटविकास अधिकाऱ्यांनी पाणी टंचाई कामांचे वस्तुस्थितीदर्शक नियोजन करावे
रायगड अलिबाग : लढवय्या रोखठोक
जिल्ह्यातील पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेने विविध उपाययोजना प्रत्यक्ष राबविण्यास सुरुवात केली असून कोणत्याही परिस्थितीत गावे आणि वाड्यांना तातडीने टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे तसेच विंधन विहिरींची कामेही त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी आज दिले. त्यांनी आज गटविकास अधिकारी व विभाग प्रमुखांच्या बैठकीत पाणी टंचाईच्या संदर्भात सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. सध्या जिल्ह्यात जिथे आवश्यकता आहे अशा ४८ गावे व १५९ वाड्या अशा २०७ गावे आणि पाड्यांना २३ टँकर्सद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येत असून मागणी वाढत जाईल तसतसे टँकर्सही वाढविण्यात येत आहेत अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. मागील आठवड्यात जिल्ह्यात १५८ गावांना १९ टँकर्स सुरु होते. आता त्यात ४ टँकर्सची भर पडली आहे.
विस्तार अधिकारी यांनी सातत्याने आढावा घ्यावा
विस्तार अधिकारी तसेच सहायक विस्तार अधिकारी यांनी आपापल्या भागात सातत्याने पाणी टंचाई बाबत आढावा घेत राहून तसेच ग्रामस्थांच्या ,नागरिकांच्या मागण्यांचा तातडीने विचार करून वस्तुस्थिती दर्शक अहवाल तयार करावेत व त्यानुसार पिण्याच्या पाण्याची उपाययोजना करावी तसेच प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्याशी समन्वय ठेवावा असेही मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी याप्रसंगी सांगितले.
अतिरक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी यांनी देखील बैठकीस मार्गदर्शन केले.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल, शीतल पुंड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरूट, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा श्री वेंगुर्लेकर यांची यावेळी उपस्थिती होती.
९४० लाख रुपयांचा टंचाई निवारण कार्यक्रम
पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ ऑक्टोबर २०१८ ते जून २०१९ पर्यंत ५४० गावे आणि १४९३ पाडे अशा २०३३ गावांसाठी ९४० लाख रुपयांच्या टंचाई कार्यक्रमावर सध्या जिल्हा परिषदेतर्फे कार्यवाही सुरु आहे अशी माहिती यावेळी उपभियंता सुरेश इंगळे यांनी दिली.
सर्वाधिक टँकर्स पेण,महाड, पोलादपुरात
सध्या एकूण २३ टँकर्स जिल्ह्यात सुरु असून सर्वाधिक ६ टँकर्स पेण मध्ये तर पोलादपूर आणि महाड मध्ये देखील प्रत्येकी ६ टँकर्स सुरु आहेत. पेण मध्ये १३ गावे आणि ५६ वाड्या अशा ६९ गावांना, महाड मध्ये ९ गावे आणि ३७ वाड्या अशा ४६ गावांना तर पोलादपूरमध्ये १० गावे आणि ३६ वड्या अशा एकंदर ४६ गावांना हे टँकर्स सुरु आहेत. कर्जत तालुक्यात १९ गावांसाठी ३ टँकर्स सुरु आहेत.
उरण, पनवेल, खालापूर, रोहा, माणगाव , मुरुड आणि तळा या तालुक्यांत प्रत्येकी एक टँकर सुरु आहे. अलिबाग, सुधागड-पाली, म्हसळा, श्रीवर्धन येथे एकही टँकर सुरु करण्याची गरज सध्या नाही.
विंधन विहिरींची कामे जलदरित्या पूर्ण
ऑक्टोबरपासून जिल्ह्यात विंधन विहिरींची कामे सुरु असून मान्यता मिळालेल्या २२७ विंधन विहिरीपैकी ४० विंधन विहिरी घेण्यात आल्या आहेत. त्यात २९ विहिरी यशस्वी झाल्या आहेत अशी माहितीही बैठकीत देण्यात आली. सर्वाधिक विहिरी महाड, पोलादपूर, पेण मध्येच आहेत. याशिवाय ३७ विहिरींची विशेष दुरुस्तीही मार्गी लागली आहे.