साडेतीन मुहुर्तातील एक मुहुर्त म्हणून दसऱ्याच्या मुहुर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनांचा, चांगल्या गोष्टींचा प्रारंभ केला जातो. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय.
‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असं म्हणत विजयादशमीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्राचा शेवटचा दिवस म्हणजे दसरा. ९ दिवस अधिष्ठान केलेल्या देवीने महिषासूर राक्षसाचा या दिवशी वध केला असे म्हटले जाते. तसेच रामानेही याच दिवशी रावणाचा वध केल्याने या सणाला विजयादशमी असेही म्हटले जाते. रावणाचे दहन म्हणजेच वाईट वृत्तींचे दहन या दिवशी करावे असे मानले जाते. या दिवशी घरोघरी पूजा-अर्चा करुन शस्त्रांची, लक्ष्मीची आणि घरातील वाहनांची मनोभावे पूजा केली जाते. झेंडूची फुले आणि आंब्याची पाने यांना आजच्या दिवशी विशेष महत्त्व आहे. दाराला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते. तसेच आपट्याची पाने सोने म्हणून लुटणे ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. एकमेकांना ही आपट्याची पाने देऊन तुमच्या कुटुंबात भरभराट होवो अशा शुभेच्छा दिल्या जातात. तसेच ‘सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा’ असे म्हटले जाते.